अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस
अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस ।
रचिले विश्वासें ज्ञानदेवें ॥१॥
नित्यपाठ करी इंद्रायणीतिरीं ।
होय अधिकारी सर्वथा तो ॥२॥
असावें ऐकाग्रीं स्वस्थ चित्त मन ।
उल्हासें करून स्मरण जीवीं ॥३॥
अंतकाळीं तैसा संकटाचें वेळी ।
हरि तया सांभाळी अंतर्बाह्य ॥४॥
संतसज्जनांनी घेतली प्रचीती ।
आळशी मंदमती केवीं तरें ॥५॥
श्रीगुरु निवृत्ति वचन प्रेमळ ।
तोफेला तात्काळ ज्ञानदेव ॥६॥