आपुलिया घरीं कष्ट तरी करीं
आपुलिया घरीं कष्ट तरी करीं ।
आणोनि घागरी गंगोदक ॥१॥
करोनि विनंती विनवितो तुम्हां ।
स्नान पुरुषोत्तमा करा वेगीं ॥२॥
उत्तम वस्त्रानें पुसावें तें अंग ।
करोनि अभ्यंग सर्वांगासी ॥३॥
परिधान वस्त्रें केलें पीतांबरें ।
तेणें हें साजिरें रूप दिसे ॥४॥
तुका म्हणे नेत्र पाहतां निवाले ।
ध्यान संचारलें हृदयामाजीं ॥५॥