भावेंविण भक्ति
भावेंविण भक्ति भक्तिवीण मुक्ति ।
बळेंविण शक्ति बोलूं नये ॥१॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित ।
उगा राहें निवांत शिणसी वायां ॥२॥
सायास करिसी प्रपंच दिननिशीं ।
हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणें ।
तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥