चहूं वेदी जाण
चहूं वेदी जाण साही शास्त्रीं कारण ।
अठराही पुराणें हरीसी गाती ॥१॥
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता ।
वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥२॥
ऐक हरि आत्मा जीवाशिव सम ।
वायां दुर्गमी न घाली मन ॥३॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ।
भरला घनदाट हरि दिसे ॥४॥