देवाचिये द्वारी
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।
तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥२॥
असोनि संसारी जिव्हे वेगु करी ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खूणा ।
द्वारकेचा राणा पांडवां घरी ॥४॥