गीता भागवत वेद उच्चारितां
गीता भागवत वेद उच्चारितां ।
पापाची तों वार्ता कोठें राहे ॥१॥
सकळ वासना नामीं जे रंगली ।
साधनें राहिली मग कैंची ॥२॥
म्हणोनिया नेम ऐसा तारी जीवा ।
होय तोचि देवा आवडता ॥३॥
उगवला दिवस जाय तो क्षणांत ।
विचारूनि हित वेगीं करा ॥४॥
तुका म्हणे स्मरा वेगीं विठोबासी ।
न धरा मानसीं दुजें कांहीं ॥५॥