जपतप कर्म क्रिया
जपतप कर्म क्रिया नेम धर्म ।
सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥१॥
न सोडी रे भावो टाकी रे संदेहो ।
रामकृष्णीं टाहो नित्य फोडी ॥२॥
जात वित्त गोत्र कुळशील मात ।
भजे कां त्वरित भावनायुक्त ॥३॥
ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी ।
वैकुंठभुवनी घर केलें ॥४॥