काय सांगू विठ्ठला तुला ।
तुझे नवलच वाटे मला ॥ धृ ॥
विठ्ठल गोऱ्या कुंभार घरी माती तुडविण्याचे काम करी ।
तेथे मडके घडू लागला ॥ १ ॥
विठ्ठल जनाबाईच्या घरी दळण कांडण्याचे काम करी ।
तेथे दळण दळू लागला ॥ २ ॥
विठ्ठल एकनाथाच्या घरी कावडीने पाणी भरी ।
तेथे पाणी भरू लागला ॥ ३ ॥
विठ्ठल सावता माळ्याच्या घरी शेतीवाडीचे काम करी ।
तेथे भाजी खुडू लागला ॥ ४ ॥
विठ्ठल रोहिदासाच्या घरी जोडे शिवण्याचे काम करी ।
तेथे जोडे शिवू लागला ॥ ५ ॥