नामपुष्प शुद्ध गळां घाला हार
नामपुष्प शुद्ध गळां घाला हार ।
विवेक सारासार तुरा लावूं ॥१॥
बोध भाळीं बुका क्षमा तुलसीदळ ।
वाहतां गोपाळ संतोषतो ॥२॥
गाइलीया गुण संतोषें तयानें ।
करितां कीर्तनें आल्हादे तो ॥३॥
आल्हादे हा देव कीर्ति वाखाणितां ।
पवाडे सांगतां याचे यास ॥४॥
याचे यास करूं सर्व निवेदन ।
वारील हा शीण संसारींचा ॥५॥
संसाराचा वारा लागों नेदी अंगा ।
भावे पांडुरंगा आळवितो ॥६॥
तुका म्हणे आतां उजळली आरती ।
भावें तो श्रीपती ओंवाळूंया ॥७॥