पाऊले चालती पंढरीची वाट,
सुखी संसाराची सोडुनिया गाठ ॥धृ॥
गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने,
पडता रिकामे भाकरीचे ताट ॥१॥
आप्तइष्ट सारे सगे सोयरे ते,
पाहुनिया सारे फिरवती पाठ ॥२॥
घेता प्रसाद श्री विठ्ठला,
अशा दारिद्र्याला व्हावा नाय नाट ॥३॥
मन शांत होता पुन्हा लागे ओढ,
जैसा परी गोड संसाराचा थाट ॥४॥