संतांचे संगती
संतांचे संगती मनोमार्ग गती ।
आकळावा श्रीपति येणें पंथें ॥१॥
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा ।
आत्मा जो शिवाचा राम जप ॥२॥
एकतत्त्व नाम साधिती साधन ।
द्वैताचें बंधन न बाधिजे ॥३॥
नामामृत गोडी वैष्णवा लाधली ।
योगिया साधली जीवनकळा ॥४॥
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला ।
उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥
ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ ।
सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥