सर्वमुखें गोडी
सर्वमुखें गोडी साही शास्त्रें निवडी ।
रिकामा अर्धघडी राहूं नको ॥१॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार ।
वायां येरझार हरिविण ॥२॥
नाममंत्र जप कोटी जाईल पाप ।
रामकृष्णीं संकल्प धरूनी राहे ॥३॥
निजवृत्ति काढी सर्व माया तोडी ।
इंद्रियांसवडी लंपू नको ॥४॥
तीर्थव्रती भाव धरिं रे करुणा ।
शांती दया पाहुणा हरि करी ॥५॥
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान ।
समाधि संजीवन हरिपाठ ॥६॥