तीर्थ व्रत नेम
तीर्थ व्रत नेम भावेंविण सिद्धी ।
वायांची उपाधी करिसी जनां ॥१॥
भावबळें आकळें येऱ्हवी नाकळे ।
करतळीं आंवळें तैसा हरी ॥२॥
पारियाचा रवा घेतां भूमीवरी ।
यत्न परोपरी साधन तैसें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण ।
दिधलें संपूर्ण माझें हातीं ॥४॥