विष्णुविण जप
विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान ।
रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥
उपजौनी करंटा नेणें अद्वैत वाटा ।
रामकृष्णीं पैठा कैसा होय ॥२॥
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान ।
तया कैंचें कीर्तन घडे नामीं ॥३॥
ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान ।
नामपाठ मौन प्रपंचाचें ॥४॥