विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा,
लिंबू लोन करा सावळ्याला ॥धृ॥
दुरल्या भेटीच्या, बहुआवडीचा,
जीवन घडीचा नारायण ॥१॥
धन्य माझे गोट, मिळाले पंढरी,
मी माझ्या माहेरी सुखी आहे ॥२॥
तुका म्हणे माझा आला सखा हरी,
संकट निवारी पांडुरंग ॥३॥
तिथं विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल,
देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल ॥धृ॥
माता विठ्ठल, पिता विठ्ठल,
बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल ॥१॥
गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल,
निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल ॥२॥
नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला,
म्हणुनी कळी कळा पाड नाही ॥३॥