यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी ।
कान्हा वाजवी बासरी ।।धृ।।
बारा सोळा गौळ्याच्या नारी ।
त्या नटूनी चालल्या मथुरे बाजारी ।
त्याने मारला खडा न माझा फोडला घडा ।
त्याने फोडिल्या घागरी ।।१।।
कान्हा वाजवी बासरी
यशोदा बोले बाळ श्रीहरी ।
छेडू नको रे गोकूळ नगरी ।
राधिकेच्या घरी कान्हा पलंगावरी ।
राधा झाली ग बावरी ।
कान्हा वाजवी बासरी ।।२।।
कान्हा वाजवी बासरी
एका जनार्दनीं गवळण राधा ।
ती विनवी तुजला अरे मुकुंदा ।
गवळ्याची नार करी सोळा शृंगार ।
झाली चरणावरी ।
कान्हा वाजवी बासरी ।।३।।