येई हो विठ्ठले माझे माउली ये
येई हो विठ्ठले माझे माउली ये।
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहें॥
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप।
पंढरपुरीं आहे माझा मायबाप॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये॥
पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला।
गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये॥
विठोबाचें राज्य आम्हां नित्य दिपवाळी।
विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये॥
असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां।
कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरीराया॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये॥